Friday, March 22, 2024

अक्कलखात्यात गेलेले मिळवण्याची युक्ती

 मागे अक्कलखाती गेलेले पैसे कसे परत मिळवायचे ते तुम्हा सर्वांना विचारलं होतं तर खूपजणांनी आपलं अक्कलखातं कसं भरलंय तेच सांगितलं, कसे परत मिळवायचे ते कोणी सांगितलं नाही. हे का लिहितेय? मी परत टाकले का पैसे अक्कलखात्यात? तर हो पुन्हा एकदा मी अक्कल खात्यात पैसे जमा केले! थांबा, थांबा पुढचा चमत्कार वाचा. ते गेलेले पैसे मी परतही मिळवले. कसे? ऐका तर माझ्या अकलेची कथा जी कदाचित तुम्हालाही तुमची वापरायला प्रवृत्त करेल!

घरातली दोन्ही कार्टी आपापल्या मार्गाला लागल्याने आम्हा दोघांना अक्कल ’खात्यात’ आता फार जमा करावी लागत नाही. साठलेली अक्कल दोघंही अचानक वापरतो त्यामुळे एकमेकांची अक्कल काढण्यात बरा वेळ जातो. आधी नवरोजींच्या अक्कलखात्याबद्दल. त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं की माझी जखम आपोआप बरी होते म्हणून.

एकाच विमानतळावर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही बसलो होतो. नवर्‍याला जरा ढिल दिली की जे होतं तेच झालं. एका बाईने त्याला गाठलं. ती ’इंडियन ओरिजिन’ ची होती म्हणून नवरोजींना दया आली. तिने विमान चुकलं म्हणून ३० डॉलर्स मागितले, तिच्या केविलवाण्या विनवण्यांमुळे कळवळून आमच्या ’ह्या’ नी तिला ते दिले. दरम्यान दोन मुलांना, एका बायकोला ’मेसेज’ पाठवला, मी काय करु? आम्ही तिघांनी काही करु नकोस असं कळवलं. पण हाय रे दैवा.... तोपर्यत गेलेसुद्धा३० डॉलर्स. मला प्रश्न पडला की ३० डॉलर्समध्ये कोणत्या विमानात जागा देतात का टपावर बसवतात? विमानतळावरच्या ATM मधून बाईचा हात लागला तर पैसे बाहेर पडत नाहीत की काय? एरवी समोर उभी राहिले तरी मी दिसत नाही पण ’इंडियन ओरिजिन’ वगैरे वर्णन... मी माझे हे विचार मनातच आळवले तर  मुलगी म्हणाली, 

"आमच्या तर १० डॉलर्सचं कुपन वापरा म्हणून मागे लागतो." तिने कुठल्याशा गोष्टीवर कुपन वापरलं नाही म्हणून तिचा बाबा तिला तिथे परत पाठवत होता. तो बेत तिने हाणून पाडला तरी अजून निखारा विझला नव्हता.

"अगं पण तू गेली कुठे होतीस?"

"ते वेगळं पण १० डॉलर्स वाचवायला आटापिटा आणि कोण कुठल्या त्या बाईला ३० डॉलर्स?" तरुण मुलीचे हे म्हणताना काय हावभाव असतील त्याचा विचार करा. तेवढ्यात तरुण मुलाचा फोन आला,

"असा कसा हा फसतो? खायला गेलं की महाग, महाग म्हणून खाऊच देत नाही आणि इंडियन ओरिजिनला ३० डॉलर्स?"

"बघा, मी कशी राहते तुमच्या बाबाबरोबर. तुम्ही सुटलात तरी. आता काय १०, २०, ३० करत बसलायत. फसू दे फसतोय तर." प्रत्येकाचं दु:ख आपापल्यापरिने पर्वतमय होतं.

जेवढी शक्य होती तितकी अक्कल आम्ही त्या गरीब नवर्‍याची काढली.  आपापसात मात्र, मरु दे. ३० डॉलर्सच तर होते असंही म्हणायचो. काही महिने गेले, सारं कसं शांत, शांत झालं आणि माझ्यावर ती वेळ आली. अक्कल खातं समृद्ध करण्याची. 

माझ्या संपादक मित्राने (फेसबुकवर नाहीये त्यामुळे कोणत्याही संपादक मित्रमैत्रिणींनी घाबरु नये) whatsapp करुन त्याची दर्दभरी कहाणी कळवली.  

"एका रिसॉर्टचं काम करतोय. कितीही पैसे लावले तरी कमी पडतायत, बायकोला दिवस गेलेयत आणि तिला एकटीला सोडून तिकडे जावं लागतं. १ लाख मिळणार होते पण मिळाले नाहीत. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत आणि बायकोच्या हातात काही दिल्याशिवाय मला निघता येणार नाही. इतरांनी आधीच खूप मदत केली आहे त्यामुळे मी कोणाला विचारु शकत नाही. तू पैसे पाठवशील का, महिनाअखेरीला देईन." आकडा पाहिला. ३० डॉलर्स रुपयात केले तरी त्याच्या वरताण होता. कधी फसलं तर नवर्‍यापेक्षा कमी एवढातरी माझा हिशोब पक्का होता. विमानतळावरची ’इंडियन ओरिजिन’ आठवली पण हा तर माझ्या ओळखीचा होता. वेळेला उपयोगी नाही पडायचं तर कधी असं म्हणत रक्कम पाठवून दिली. 

दोन, चार, सहा महिन्यांनी आठवण करुन दिली आणि मग थेट मुंबईतच त्याला भेटले. त्यानिमित्ताने एक भारतवारी.

"पैसे घेऊन ये." मला हुकुम सोडल्यासारखं वाटत होतं. 

"हो आणतो." माझ्या डोळ्यासमोर माझ्याच पैशांचं डबोलं नाचायला लागलं. आतुरतेने मी संपादकाच्या वाटेकडे डोळे लावून चहा ढोसत बसले. तो आला, बसला, बोलला आणि निघून गेलाही.  

"तू पैसे आणायला गेलीस आणि तुझ्याच पैशानी त्याला खाऊपिऊ घातलंस?" मैत्रीण गडबडा लोळायची तेवढी बाकी होती. 

"नवर्‍याची अक्कल तू काढलीस तशी नवर्‍याने  काढली की नाही तुझी आणि मुलांनी?" नको तो प्रश्न आलाच.

"मोहिम फत्ते झाल्याशिवाय सांगणार नाहीये त्यांना." मी पुटपुटले.

"म्हणजे तुझ्या घरात कोणालाच तू सांगितलं नाहीयेस?" मी मान हलवली.

"ही फसवणूक आहे." मैत्रीण म्हणाली. तिला पुढे बोलू न देता मी म्हटलं,

"सांगणार आहे गं बये. आधी पैसे परत मिळवू. चल घरी जाऊ या त्याच्या."  

"पत्ता?"

"विचारते." पत्ता मिळाला की आपण जायचं, धरणं धरायचं, नाही ऐकलं तर पूर्वी भाऊ कसे छेड काढणार्‍या मुलांना तुडवायला जायचे तसं भावाला पाठवायचं असे सगळे बेत मी तिला ऐकवले. मैत्रीण गडबडा लोळत होती ती उठून बसली. 

"पत्ता?" भुवया उंचावत परत तिचं तेच. घाईघाईत माझं पुस्तक पाठवते असा गळ टाकला पण असल्या फुटकळ गोष्टींना दाद लागू देईल तर तो फसव्या कसला?

हात हलवत परतले भारतातून आणि लेखणी सरसावली. रोज उठून संपादकाला छळायचं असा डाव ठरवला.

"गुंडांना पाठवू का?" उत्तर नाही.

"तु्झ्या युट्युब वाहिनीवर शिवीगाळ करु का?" उत्तर नाही.

"बायकोशी बोलू तुझ्या?" उत्तर नाही.  बायकोला घाबरत नाहीस. तुझ्या पापाचा घडा भरला आता अशी गर्जना ठोकत मी त्याच्या वाहिनीवर धडकले पण काही वेडंवाकडं लिहायला होईचना. शरणागती पत्करणं एवढंच राहिलं होतं. नवर्‍यासमोर मानहानी! त्याच्यासमोर ततपप करत उभी राहिले आणि ’इंडियन ओरिजिनच’ दिसायला लागली. तो आणि मी एकमेकांकडे पाहायला लागलो, बोलायला जीभ उचलेना त्यामुळे डोळे भरुन पाहणं चालू होतं आणि माझी पेटली. नवर्‍याच्या डोळ्यांची जादू! मी पळालेच. तो अगं, अगं करतोय तोपर्यंत मी फोन घेतला आणि संपादक मित्राला कळवलं. लिहिण्यात पण आवेश दिसला असता तर त्याने पैसे घेऊन अमेरिका गाठली असती.

"तुझं युट्युब रिपोर्टच करते मी. थांबच तू." लिहिलं आणि ५ मिनिटं टवकारुन मी लिहिलेली वाक्य वाचली कधी जातात म्हणून बघत बसले. उत्तर नाही. हा बारही फुसका ठरला म्हणून परत नवर्‍याच्या डोळ्यात डोळा घातला आणि फोन वाजला. बॅंकेने कळवलं होतं.

"१५००० रुपये जमा!" 

१५००० रुपये जमा, जमा, जमा असं करत एवढा आरडाओरडा केला की नवरा गडबडून गेला.

"नुसते डोळ्यात डोळे घातलेस, उड्या मारतेस... आता नक्की काय झालं ते सांगणार आहेस का?"

"तुझे अक्कलखाती गेले ना ३० डॉलर्स?" मी आधी मीठ लावून टाकलं. त्याने फक्त डोळ्यात डोळा घातला.

"माझेपण गेले होते तुझ्यापेक्षा खूप जास्त. पण मी मिळवले. जमा, जमा, जमा." असं म्हणत आधी अक्कल गहाण टाकून पैसे कसे घालवले आणि मग अक्कल वापरुन ते परत कसे मिळवले ते सांगितलं. नवरा हसला आणि म्हणाला,

"पण व्याजाचं काय? ते गेलं की अक्कल खात्यात." 

जाऊ देत ना. एवढं काय त्यात? १०००० तर परत मिळवले ना. नवर्‍याने दिली नाही पण तुम्ही तरी द्याल ना शाबासकी?

आधीचं अक्कलखातं इथे - https://mohanaprabhudesai.blogspot.com/2018/10/blog-post.html

Tuesday, February 27, 2024

मराठी भाषा दिन

 "ही माझी अमेरिकन आई." माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,

"युवर मॉम इज हॅपी दॅट आय ॲम हिअर फॉर यू.  ॲड शी इज नॉट वरीड अबाऊट यू नाऊ. इज दॅट राईट?" माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. ४० शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणार्‍या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणार्‍या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्चासाचंही अमाप कौतुक वाटलं. तिला हिंदी, इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती पण त्यामुळे तिचं पार साता समुद्राकडे येऊनही अडलं नाही. या आधीही तसं ते कधीच कुठे अडलं नाही हे आधी कधी जाणवलं नव्हतं इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचं ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्यापर्यंत पोचवायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता.


आम्हा भावंडाचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला म्हणून  आई - वडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतीलच असं नाही त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कुणास ठाऊक.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत आता चाळीशीच्या आसपास असणारी एक अख्खी पिढी मोठी झाली.  आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी,  स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको, उत्कर्ष कसा होईल, मुलांना ’व्यवहाराची’ भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागू दिलीच नाही.  आमच्या सारखे पालक बरेच आहेत  हे कळलं तेव्हा वेळ टळून गेली होती.  इंग्रजी माध्यमात न शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला.  पण हे लक्षात येईपर्यंत तसं खूप नुकसान आमचं आम्ही केलंच भरीला आमच्या मुलांचंही.  आम्ही शिकलो, नोकर्‍यांना लागलो, मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागलं.  इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी, दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते ह्या गोष्टीचं महत्त्व आता समजतंय.  इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खूश होते. आता मुलांची उत्तम प्रगती होईल, आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर गाठतील, आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं  ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी  भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कळलंच नाही कुणाला. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ह्या विचारसरणीची चूक आधी घराघरांना भोवली मग समाजाला. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना, घरातही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांमध्ये अधूनमधून चवीला काजू, बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले.  घरोघरच्या ह्या चुकीची  फळं समाजाला भोगायला लागली. वास्तवाचं भान येईपर्यंत मराठी शाळा हळूहळू बंदही पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मुलांना मराठी शाळांमध्ये घालायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच झालं.  मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करुन त्याचं भाषांतर व्हायला लागलं.  कुणाला जपून राहा असं सांगण्याऐवजी काळजी घे असं टेक केअरचं शब्दश: भाषांतर सर्रास वापरात आलं. मराठीचं स्वरुपच बदललं. राडा होईल घरी अशी वाक्य मालिकांमधून सर्रास ऐकायला लागली, जीव तळमळण्याऐवजी तडफडायला लागला. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी रुढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण, भाषेच्या शुद्धतेचं काय इतकं ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा, मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणार्‍यांनी शरणागती पत्करली.  काळाबरोबर बदललेल्या मराठीशी जुळवून घ्यायला हवं असं म्हणत चुकीचं, इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारुन घ्यायला ही माणसं शिकली.


आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली, वाढली. इतकी वाढली की  ती मराठी ’दीन’ झाली.  दिवस साजर्‍या करण्याच्या आपण सुरु केलेल्या नवीन प्रथेत  एक दिवस ’मराठी’ ला मिळाला. राज्यसरकारही यासाठी पुढे सरसावलं आणि तो दिवस ठरला २७ फेब्रुवारी!  जागतिक मराठी भाषा दिन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यायला लागला. कोण हे कुसुमाग्रज आणि जयंती म्हणजे? असा  इंग्रजी माध्यमातल्या मुलांना प्रश्न पडला. तो सोडविण्याची जबाबदारी तर आता आपण उचलायलाच हवी. नाही का? इथे अमेरिकेत आमच्यासारखी अनेकजण आपली मातृभाषा मुलांना यावी, ती त्यांनी टिकवावी, वापरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत.


 माझ्याकडे मराठी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी दिनाबद्दल सांगितलं तेव्हा असा दिवसही असतो याचंच नवल वाटलं मुलांना. कुसुमाग्रज ठाऊक नव्हते पण त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता मात्र होती. त्या उत्सुकतेमुळे माझ्या  आशा पल्लवित झाल्या आहेत.  मराठी भाषा दिन म्हणजे आपली भाषा समजणं, बोलता येणं इतका मर्यादित अर्थ नाहीच. नसावा. मुलांना कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख करुन द्यायची, त्यांचं साहित्य वाचून दाखवायचं असं ठरवून टाकलं. कदाचित यातून मराठी साहित्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेलही. आवड निर्माण होईल. व्यक्त होण्यासाठी मराठी लेखन प्रपंचही मांडतील कदाचित कुणी एखादं त्यातलं. होईल खरंच असं? की भ्रामक आशावाद?  आपल्याच हातून दुसरीकडे वळलेली ही वासरं  येतील पुन्हा कळपात? आमच्या पिढीने मुलांना जसं इंग्रजीकडे वळवलं तसंच पुन्हा मराठीकडे आणण्याचं कामंही आम्हीच करु शकतो हे नक्की. आपापल्या पिलांना मराठीच्या मार्गावर आणायचं घेईल कुणी मनावर? जमेल? नक्कीच. मनात आणलं तर होऊ शकतं हे आणि शेवटी कितीतरी गोष्टी आपल्याच हातात असतात. नाही का?